प्रश्नोत्तरे

1 प्रश्न- खातेदाराने पूर्वी मंजूर केलेल्या नोंदीतील नाव चुकल्यामुळे ते दुरुस्त केल्याची मागणी केली असल्यास काय कार्यवाही अपेक्षित आहे?
उत्तर- अशा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नव्याने नोंद घालू नये लेख्न प्रमादाची चूक दुरुस्ती करण्यासाठी संबंधितांनी थेट तहसिलदार यांचेकडे अर्ज केला पाहिजे.
2 प्रश्न- कोणताही अर्ज तहसिलदार यांचेकडून आदेश न होता केवळ योग्य ती कार्यवाही करावी असा शेरा मारुन तलाठी अथवा मंडळ अधिकारी यांचेकडे आल्यास काय करावे ?
उत्तर- त्याआधारे कोणत्याही परिस्थितीत नोंद घालण्यात येवू नये जमिन महसूल अधिनियमाच्या योगय त्या तरतूदी खाली आदेश केल्याशिवाय नोंदी करु नयेत.
3 प्रश्न- एखाद्या व्यक्तीने रजिस्टर्ड खरेदी दस्तावरुन नोंद होण्यासाठी दस्ताची प्रत जोडून तहसिल कार्यालयात अर्ज केला व त्या अर्जावर शेरा मारून तो अर्ज संबंधित तलाठी यांचेकडे पाठविण्यात आल्यास कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी ?
उत्तर- खरेदी दस्तावरून फेरफार नोंद धरुन घ्यावी, नोंदीमध्ये कोणत्याही परिस्थितीत तहसिल कार्यालयाच्या पत्र क्रमांकाला आदेश मानुन व त्याचा उल्लेख करुन फेरफार करण्याचे कारण नाही, हक्क हा खरेदीदस्ताने निर्माण होतो. कार्यालयाच्या शेऱ्यामुळे नाही.
4 प्रश्न- तक्रार नोंद चालू असताना संबंधित मंडळ अधिकारी यांचेविरुध्द ते नि:पक्षपातीपणे काम करीत नसल्याचे आरोप करुन अविश्वास व्यक्त केला अशा वेळी काय करावे ?
उत्तर- संबंधित पक्षकराला वरिष्ठांकडे अर्ज करुन प्रकरण दुसऱ्या अधिकाऱ्या कडे वर्ग करुन घेण्याचा अधिकार आहे. किंबहूना नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने स्वत:हून अन्य अधिकाऱ्याकडे प्रकरण वर्ग करण्याआधी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला पाहिजे.
5 प्रश्न- तक्रार नोंद सुरु झाल्याबरोबर इतर पक्ष्रकारांनी तक्रारीची माहिती मागीतली तर काय करावे ?
उत्तर- कोणतीही केस सुरु होताना मूळ तक्रारीच्या प्रती सर्व् संबंध्रितांना देणे बंधनकारक आहे. वादीने अशा प्रती सर्व प्रतिवादींना दयाव्यात. म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी स्पष्ट व लेखी आदेश दिले पाहिजेत.
6 प्रश्न- केस चालू असताना साक्षीदारांना हजर राहण्यासाठी एका पक्षकाराने मागणी केली तर कोणत्या प्रकारची कार्यवाही करावी ?
उत्तर- महाराष्ट्र्‍ जमिन महसूल अधिनियमाच्या कलम 227, 228 व 229 नुसार पुरावा देण्यासाठी व दस्तऐवज सादर करण्यासाठी समन्स काढण्याचा व उपस्थित राहण्यास भाग पाडण्याचा अधिकार अव्वल कारकून किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यास आहे.
7 प्रश्न- नोंदीबाबत तक्रार आल्यानंतर संबंधितांना नोटीस पाठविण्यासाठी कोणती कार्यवाही करावी ?
उत्तर- महसूल अधिनियमाच्या कलम 243 नुसार कोणत्याही केसमध्ये उद्भवलेला खर्च मंजूर करण्याचे अधिकार महसूल अधिकाऱ्यांना आहेत. संबंधितांना प्रोसेस फि भरण्याबाबत किंवा त्यांच्या खर्चाने नोटीस बजावणेबाबत या कलमाखालील आदेश काढता येईल.
8 प्रश्न- अतिशय वादग्रस्त असणाऱ्या प्रकरणी नियमानुसार योग्य तो निर्णय देवूनसुध्दा तक्रार होण्याची शक्यता असेत तर कोणती कार्यवाही करावी ?
उत्तर- महसूल अधिनियमाच्या कलम 256 नुसार महसूल अधिकारी योग्य त्या मुदतीपर्यंत स्वत:चे आदेश स्थगित करण्याबाबत निर्देश देवू शकतो.
9 प्रश्न- आदेशामध्ये लेखन प्रमाद झाला असेल तर काय करणे योग्य होईल ?
उत्तर- महसूल अध्रिनियमाच्या कलम 258 नुसार अशा आदेशाचे पुनर्विलोकन करता येईल व रितसर सुनावणी नंतर दुरुस्त आदेश पारित करता येईल.
10 प्रश्न- दोन व्यक्तीमधील प्रकरणात अपिल अधिकारी यांनी निकाल दिल्यानंतर तिसऱ्यास व्यक्तीचे नाव 7/12 वर आढळल्याने अंमलबजावणी करणे शक्य नसल्यास काय करावे ?
उत्तर- अद्यावत वस्तुस्थिती निदर्शनास न आणता संबंधितांनी केस चालविल्याचे स्पष्ट होते. ही वस्तुस्थिती अपिल प्राधिकारी निदर्शनास आणावी.
11 प्रश्न- तक्रार नोंद चालू असतानाच मध्येच एखाद्या पक्षकाराने अंतरिम अर्जाद्वारे हरकत घेतली तर काय करणे योग्य होईल ?
उत्तर- हरकतीबाबत तोंडी अथवा संक्षिप्त रित्या सुनावणी घेवून लेखी स्वरुपात थोडक्यात आदेश पारित करावेत. अर्ज मंजूर अथवा नामंजूर करण्याची कारणे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करावीत.
12 प्रश्न- एखाद्या व्यक्तीने जमिन मालकाविरुध्द दिवाणी कोर्टातून ताब्याबाबतचे मनाई आदेश मिळाल्यावर त्यावरुन फेरफार नोंद करण्याची मागणी केली तर काय करावे ?
उत्तर- मनाई आदेश व जमिनीमधील हक्क संपादन या दोन स्वतंत्र बाबी आहेत. मनाई आदेश मिळाल्यामुळे फेरफार नोंद करण्यासाठी हक्क संपादन झाला असे म्हणता येत नाही.
13 प्रश्न- रजिस्टर दस्तामध्ये गट क्रमांक चुकला तरी नाव बरोबर असल्यामुळे नोंद करण्याची खातेदाराने मागणी केल्यास काय कार्यवाही करावी ?
उत्तर- मुळ दस्तामधील सोइृस्कर मजकूर वापरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. दस्त हा मूळ व कायम पुरावा असल्याने त्यातील चुक दुरुस्त दस्ताद्वारे दुरुस्त केल्याशिवाय नोंद मंजूर करण्यात येवू नये.
14 प्रश्न- व्यवहारातील काही हितसंबंधि व्यक्ती गावी रहात नसतील व त्यांचे पत्ते उपलब्ध्‍ होत नसतील तर काय करावे ?
उत्तर- मूळ दस्तावरुन व ज्याचे नाव या नोंदीमुळे लागणार आहे त्याच्याकडून हितसंबंधीतांचे पत्ते घ्यावेत व नोटीस बजवावी. हक्क नोंदणीची मागणी करणाऱ्या व्यक्तीवर कागदपत्रे व माहिती पुरविण्याची पूर्ण् जबाबदारी आहे.
15 प्रश्न- तक्रारी नोंदीच्या सुनावणीच्या वेळी पुराव्यादाखल हजर केलेले मुळ दस्तऐवज संबंधीत व्यक्तीने परत मागितल्यास काय कार्यवाही करावी ?
उत्तर- महाराष्ट्र्‍ जमिन महसूल अधिनियमाच्या कलम 239 नुसार पुराव्या दाखल उपयोग केलेले मूळ दस्तऐवज (प्रमाणित प्रती रेकॉर्ड वर ठेवून) संबंधित व्यक्तीला परत दिले पाहिजेत.
16 प्रश्न- शेतजमिन तीन जणांनी मिळून एकाच खरेदीखताने घेतली परंतु दुर्देवाने घेणाऱ्यापैकी एकजण अकस्मात मयत झाला त्यामुळे अद्याप नोंदीसाठी अर्ज केला नसेल तर काय कार्यवाही करावी ?
उत्तर- कायदेशीर खरेदीखत करुन घेतल्यानंतर एखादी व्यक्ती मयत झाली तर त्या व्यक्तीच्या हक्कांस बाधा पोहचत नाही. रितसर कायदयानुसार खरेदीदारांची नावे 7/12 स लागू शकतील. एकदा नोंद झाल्यानंतर खरेदी घेणा्ऱ्या खातेदाराची वारस नोंद करण्यासाठी अर्ज दाखल करावा.
17 प्रश्न- मुंबईला राहणाऱ्या जमिन मालकाची जमिन एखादा व्यक्ती गेली 10 वर्षे स्वत: कसतो. त्या जमिनीत त्याने विहिर काढली आहे व स्वत: पिके घेतो. त्याला जमिनीतून काढून टाकण्यासाठी जमिन मालकाने मनाईचा दावा लावला होता. तो दिवाणी न्यायालयाने फेटाळला आहे. तरी त्याचे नावे 7/12 ला कब्जेदार सदरी लावले जात नाही याचे कारण काय ?
उत्तर- मनाई आदेश व जमिनीतील हक्क संपादन या दोन स्वतंत्र बाबी आहेत. मालकाचा मनाई आदेश फेटाळला म्हणून ती व्यक्ती जमिनीची आपोआप मालक होत नाही. त्यामुळे 7/12 वर मालक म्हणून त्याचे नाव लावता येणार नाही.
18 प्रश्न- एखादया व्यतीने एखादया शेतकऱ्याकडून जमिन विकत घेतली. खरेदी दस्तात त्याचे नाव बरोबर आहे. परंतु चुकुन गट नं 45 ऐवजी 445 असा खदेरी खतात लिहिला गेला. देणाऱ्याचे गट नं. 45 ला नाव तरी देखील तलाठी नोंद करत नाहीत अश्या परिस्थीतीत काय करणे योग्य होईल ?
उत्तर- मूळ दस्तामधील आपला सोईचा असणारा मजकूर वापरण्याचा प्रश्न उद्भवत नाही. दस्त हा मूळ व कायम पुरावा आहे. त्यामुळे त्यातील चुक दुरुस्त करुन नव्याने चुक दुरुस्तीचा दस्त केल्याशिवाय नोंद मंजूर करता येणार नाही.
19 प्रश्न- एखादया व्यक्तीने सहा महिन्यापूर्वी दोन एकर जमिन खरेदी केली आहे. परंतु अद्याप नोंद झाली नाही. ज्याच्याकडून जमिन घेतली आहे ती व्यक्ती नोंदीसाठी सही देण्यास तयार नाही तर काय करावे ?
उत्तर- जमिन खरेदी केल्यानंतर अ पत्रकाचे आधारे तलाठयाने स्वत:हून नोंद करणे अपेक्षित आहे. अशी नोंद झाली नसेल तर खरेदीखताची सत्यप्रत जोडून थेट तलाठयाकडे / तहसिलदाराकडे नोंद होणेसाठी अर्ज करावा. खरेदी देणारा इसम नोंद होण्यासाठी पुन्हा सही देत नाही म्हणून नोंद न होण्याचे कारण नाही फक्त त्या इसमास नोटीस बजावली जाईल. असे कायदा सांगतो, त्यामुळे तलाठयाला त्या इसमाचा पूर्ण पत्ता दयावा.
20 प्रश्न- एखादी व्यक्ती शेजाऱ्याची अनेक वर्षे कसत होता. 1982 साली त्याने अर्जावरून फेरफार नोंद घालून त्याचे नाव 7/12 उताऱ्यावर मालक सदरी चढविले आहे. मूळ मालक आता ती नोंद उलटून घेणार असे म्हणतो. अशा परिस्थितीत काय कार्यवाही करता येईल ?
उत्तर- अर्जाच्या आधारे जमिनीमध्ये मालकी हक्क निर्माण होत नाही. मालकी हक्क हा खरेदी खत वारसा हक्क उत्तराधिकार इ. प्रकारच्या दस्ताच्या आधारे प्राप्त होतो. कोणताही कायदेशीर दस्त नसताना नाव मालक सदरी लागले असेल तर ती चूक दुरुस्त करुन घेण्याचा मूळ मालकास हक्क आहे.