पर्यटन

धार्मिक स्थळे
बल्लाळेश्वर
tour गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबात बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासून ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे.
कुलदेवता श्री भोराई देवी
tour भोर संस्थानिकांची कुलदेवता श्री भोराई देवी १५ किमी. अंतरावर आहे देवीची स्थापना भृगू ऋषींनी केली आहे. नवरात्रामध्ये १० दिवस गडावर मोठय़ा प्रमाणात उत्सव साजरा होतो. देवीची स्थान जागृत आहे. ह्या किल्ल्याला ``सुधागड'' असे म्हणतात.
वरदायिनी देवी
tour श्री रामास ज्या ठिकाणी देवीपासून वर प्राप्त झाला ते ठिकाण उसर येथे आहे. त्या देवीस ``वरदायिनी'' असे संबोधतात. हे निर्सगरम्य स्थान पालीपासून ९ कि. मी. अंतरावर आहे. ही पालीची ग्रामदेवता आहे. येथेही नवरात्रात दहा दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो.
पर्यटन स्थळे
सरसगड
tour देवालयातून दिसणारा सरसगड हा शिवाजी कालीन टेहेळणीचा किल्ला आहे, किल्ल्यावर टेहेळणीचे बुरूज व प्राचिन शिवमंदिर पहाता येते.
गरम पाण्याचे झरे उन्हेरे
tour पालीपासून ४ किलोमीटर अतंरावर भूगर्भातून भुपृष्ठावर वहाणारे गंधयुक्त गरम पाण्याचे झरे उन्हेरे येथे पहावयास मिळतात. तेथेच पाली गावाला पाणीपुरवठा करणारे ``उन्हेरे धरण'' हा मातीचा बंधारा आहे. येथून जवळच केशवनगर येथे ``श्री रुद्रेश्वर शिवमंदिर'' आहे. येथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो. श्रावणी सोमवारी `बर्फाची वाडी' भरली जाते.